A Chat with Dr. Jayant Narlikar
खगोल मंडळ आणि रुईया महाविद्यालयाच्या वतीने १४ एप्रिल २०१३ रोजी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची त्यांच्याच ‘चार महानगरांतील माझे विश्व’ या आत्मकथनावर आधारित प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत घेतली खगोल मंडळाच्या दिलीप जोशी आणि डॉ. अभय देशपांडे यांनी. ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकप्रभा’ या मुलाखतीचे माध्यम प्रायोजक होते. या मुलाखतीतून उलगडलेले डॉ. जयंत नारळीकर..
नारळीकर हे तुमचं आडनाव कसं आलं?
नक्की सांगणे अवघड आहे पण जे मला माहिती आहे त्यानुसार कोल्हापूरमध्ये येण्याआधी आम्ही तिथून जवळच असलेल्या पाचगावमध्ये राहायचो. तेथे आमच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला नारळाएवढे मोठे आंबे लागत. त्यावरून आमचं आडनाव नारळीकर पडलं असं सांगितलं जातं. आता मी असं म्हणत असेन तर तुम्ही विचाराल की आंब्याच्या झाडाला नारळाएवढे आंबे येणं याला वैज्ञानिक पुरावा काय..तर असा काही पुरावा माझ्याकडे नाही. पण हे जाणकार लोकांचं म्हणणं आहे. तेव्हा असं काहीतरी असू शकतं.
तुमचा जन्म कोल्हापूरचा. बालपण बनारसला गेले. शालेय शिक्षण हिंदीत, सर्व उच्च शिक्षण महाविद्यालयात, पण मग मराठीत इतके विस्तृत आणि सकस लिखाण कसे काय शक्य झाले?
माझ्या लहानपणी घरी मराठीच बोललं जायचं. नोकरचाकर हिंदी होते. घरी खेळायला येणारी मुलं हिंदीत बोलायची. त्यामुळे दोन्ही भाषा या मातृभाषेसारख्याच होत्या. मराठीतून लिहिणे-वाचणे हे सुरुवातीपासूनच होते. तर तिसऱ्या इयत्तेपासूनच इंग्रजी असल्यामुळे पुढे महाविद्यालयीन जीवनात भाषा बदलली तरी ते फारसे जड गेले नाही. मात्र शाळेतल्या सुरुवातीच्या वर्षांत आपल्या मातृभाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यामुळे विज्ञानाचे आकलन चांगले होऊ शकते, असे माझे मत आहे.
मातृभाषेतून विज्ञान चांगले कळते असे म्हटले जाते, ते बरोबर आहे का?
विज्ञान कळायला तुम्हाला तुमची मातृभाषाच जास्त उपयोगी पडते. इंग्रजीत सांगितले तर तुमचा मेंदू प्रथम त्याचे मराठीकरण, हिंदीकरण करतो आणि मग समजून घेतो. त्यामध्ये वेळ जातो, वेगळे परिश्रम करावे लागते ते येथे करावे लागत नाहीत. त्यामुळे ते जास्त सहजगत्या आत्मसात होते असे मला वाटते.
उच्च शिक्षणात इंग्लिश माध्यम असावे की नाही?
तुम्ही जेव्हा पदवी शिक्षण घेत असता तेव्हा त्या विषयाचे बहुतांश साहित्य, माहिती ही इंग्रजीत उपलब्ध असते. मुख्यत: तुम्ही विज्ञानासारखे विषय शिकत असाल तर हे प्रमाण जास्तच असते. त्या माहितीचा साहित्याचा लाभ घायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी चांगले यायलाच हवे.
आपणास गणिताइतकीच संस्कृतची आवड होती, त्यामुळे कधी आर्ट्सला जावे असे वाटले का?
मला संस्कृत आवडत होते, मॅट्रिकला संस्कृतला चांगले मार्कदेखील होते. पण मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत, असे मला सांगितले गेले. मला अजून एक-दोन विषयांत शिकायचे होते. खरे तर असे जास्त पर्याय असायला हवेत. जास्त विषय घेऊन पुढे जाता आले पाहिजे. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचा जो फायदा होतो नक्कीच महत्त्वाचा असतो. पण आपण हे जे असे कंपार्टमेंट करतो ते चुकीचे आहे. कला शाखेचा विज्ञान शाखेशी संवाद नाही, ही जी वृत्ती आहे ती असू नये असे मला वाटते.
मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत, असे मला सांगितले गेले. मला अजून एक-दोन विषयांत शिकायचे होते. खरे तर असे जास्त पर्याय असायला हवेत. जास्त विषय घेऊन पुढे जाता आले पाहिजे. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचा जो फायदा होतो नक्कीच महत्त्वाचा असतो.
आपल्या अवांतर वाचनाविषयी थोडेसे सांगाल का?
सुरुवात झाली ती एकदम वेगळी होती. आई मला आणि माझ्या भावाला गोष्टी सांगायची, त्या ऐकत आम्ही रात्री झोपी जायचो. पण तिच्याजवळच्या सगळ्या गोष्टी सांगून संपल्यावर वडिलांनी आईला अनेक पुस्तके दिली, त्यातील गोष्टी वाचून ती आम्हाला सांगायला लागली. पण पुढे पुढे असं व्हायला लागलं की आज ती जिथंपर्यंत गोष्ट सांगून थांबायची ती गोष्ट दुसऱ्या दिवशी रात्री पुढचा भाग ऐकायला मिळायची. म्हणजे तब्बल २४ तास.. मग त्या गोष्टीत पुढे काय झाले, हे समजून घ्यायला मी ते पुस्तक उघडून ती गोष्ट वाचायला लागलो. म्हणजे मला कोणी असे सांगितले नाही की हे पुस्तक तू वाचायला पाहिजेस, अमुक काळात हे वाचून पूर्ण कर वगैरे.. असे अगदी सहजपणे वाचणे सुरू झाले. मराठी िहदी आणि इंग्लिश अशा तीनही भाषेत मग मी वाचू लागलो.
बनारसमधले तुमचे दिवस कसे होते? महाराष्ट्रातील बरेच नामवंत तुमच्या घरी यायचे..
महाराष्ट्रातून दोन कारणांसाठी लोक बनारसला यायचे. एक म्हणजे गंगास्नान करायला, दुसरे माझ्या वडिलांना भेटायला. माझ्या वडिलांचा संपर्क दांडगा होता. विनोबा भावे, तुकडोजी महाराज, गोळवलकर गुरुजी, ना. सी. फडके अनेकदा आमच्या घरी येत. अनंत काणेकर व दीनानाथ दलालांची जोडी भारतभ्रमण करताना आमच्याकडे आली होती. आणखी एक उल्लेख आवर्जून करावा लागेल तो म्हणजे, नारायणराव व्यास यांचा.
सांगण्यासारखी एक आठवण गोष्ट म्हणजे माझे वडील रोज सकाळी उठल्यावर घरच्या गच्चीवर तासभर वाचन करायचे. तेव्हा त्यांना कोणाचा अडथळा खपत नसे. एकदा विनोबाजी आले, तेच अगदी पहाटे पहाटे. आता ते आल्याचे वडिलांना कोण सांगणार? शेवटी माझ्यावर ही जबाबदारी आली आणि मी गच्चीवर जाऊन वडिलांना सांगितले. तसे विनोबांना भेटायला वडील लगेच उठले. अर्थात विनोबाजीच आलेले असल्याने वाचनात व्यत्यय आणला म्हणून वडील काही माझ्यावर रागावले नाहीत. उलट त्यांना सांगितले नसते तर कदाचित ते रागावले असते.
दुसरे म्हणजे नारायणराव व्यास. त्यांचा आणि वडिलांचा चांगलाच स्नेह होता. ते वडिलांपेक्षा वयाने मोठे होते, अधूनमधून ते वडिलांना हे कर ते करू नको, असा सल्लादेखील देत. एके दिवशी त्यांनी आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या भावाला बोलावून सांगितले की तुम्ही दोघे खूप परावलंबी आहात, तुमची आई किंवा नोकर तुमची सगळी कामे करतात. तुम्ही काहीच करीत नाही. हे काही बरोबर नाही असे म्हणून त्यांनी मोठे व्याख्यानच लावले. एरवी आमच्याशी गप्पागोष्टी करणारे व्यास असे बोलले म्हणून आम्ही खट्ट झालो. पण त्यांनी आई-वडिलांनादेखील बोलावून हे सांगितले. इतकेच नाही तर आम्ही अभ्यास करताना कधीच दिसत नाही म्हणून तक्रार केली. यावर आमचा कायम वर्गात वरचा नंबर असतो म्हणून आम्ही त्यांना काही बोलत नाही, असे माझे वडील म्हणाले. त्यावर व्यासांनी आम्हाला ठरवून अभ्यास करायची सवय लागणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. पुढे जेव्हा अभ्यासक्रम कठीण होईल तेव्हा तुम्हाला ही सवय उपयोगी पडेल, असेही ते म्हणाले. झाले, तेव्हापासून आम्हाला पहाटे लवकर उठून दिवसाला चार तास अभ्यास करण्याचे फर्मान वडिलांनी सोडले. आम्हाला हे त्रासदायक होते, त्यामुळे व्यास मामांचा खूप राग आला. पण या अभ्यास करण्याच्या सवयीचा पुढे केम्ब्रिजमध्ये खूप फायदा झाला. कारण तेथे या पद्धतीने अभ्यास करणे आत्यंतिक गरजेचे होते.
आम्ही आयुकात विज्ञान सामान्यांपर्यंत पोहचवतो याचे पुलं आणि सुनीतीबाईंना कौतुक वाटले. त्यांनी मग त्या कामासाठी आम्हाला देणगी दिली. त्यातून आम्ही मुलांसाठी नावाची एक वास्तू बांधली. तिचं नाव काय ठेवायचं, असा प्रश्न पुढे आला तेव्हा ‘पुलस्य’ हे नाव पुढे आलं.
रँग्लर परांजपे यांचा आणि तुमचा एक लहानपणीचा फोटोदेखील आहे..
रँग्लर परांजपे म्हणजे सीनिअर रँग्लर, केम्ब्रिजमधील रँग्लरांमध्ये पहिले. वडिलांवर त्यांचा खूप प्रभाव होता, त्यांच्यापुढे ते अतिशय दबून वागत. एकदा वडिलांनी रँग्लर परांजपे यांना विद्यापीठात फिरवून आणायची जबाबदारी आमच्यावर सोपवली. एकंदरीतच रँग्लर परांजपे यांचा वडिलांवरील प्रभाव पाहता आम्हाला खूप भीती वाटत होती. पण त्यांना घेऊन विद्यापीठ फिरताना आम्हाला हा दबाव अजिबात जाणवला नाही. ते आमच्याशी खेळीमेळीने वागले. असे ते बऱ्याच वेळा यायचे. ते जेव्हा प्रथमच आमच्याकडे आले होते तेव्हा मी एक वर्षांचा असेन. त्यांना निरोप द्यायला आम्ही सगळे स्टेशनवर गेलो होतो. वडील गाडीची चौकशी करायला गेलेले असताना आईने मला रँग्लर परांजपे यांच्या कडेवर देऊन फोटो काढून घेतला. कारण असं काहीतरी करणं वडिलांना आवडणार नाही, असं तिला वाटत होतं. वडिलांनी नंतर हा फोटो बघितला आणि त्यांना तो आवडला.