गप्पा नारळीकरांशी

श्रोत्यांच्या प्रश्नांना डॉ. नारळीकरांनी दिलेली उत्तरे..

* वैज्ञानिकांनी श्रद्धावान असावे का?
तुमची श्रद्धा कशावर आहे, यावर ते अवलंबून आहे. काही गोष्टींवर श्रद्धा ठेवून मनाला बरे वाटत असेल, तुमच्या नीरक्षीरविवेकावर प्रभाव पडत नसेल तर श्रद्धा ठेवायला हरकत नाही.

श्रोत्यांनी डॉ नारळीकरना विचारलेले प्रश्न हाताळताना मिलिंद काळे व प्रदीप नायक
श्रोत्यांनी डॉ नारळीकरना विचारलेले प्रश्न हाताळताना मिलिंद काळे व प्रदीप नायक

* लग्न जमवण्यापूर्वी पत्रिका पाहणे किती योग्य आहे?
दोन माणसांचे एकमेकांशी जमेल की नाही हे पत्रिका ठरवू शकते, या गोष्टीला काहीही शास्त्रीय आधार नाही. यासंदर्भात अमेरिकेत एक-दोन संशोधने झाली आहेत. त्यातूनही असाच निष्कर्ष निघाला आहे.

* ब्रेन ड्रेनबद्दल तुमचे मत काय?
परदेशात गेलेल्या सगळ्यांनी परत यावे असे आपण सरसकटपणे म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे असते. आपल्याला जे काम करायचे असेल, ते करायची सोय जिथे चांगली असेल तिथे ते करावे, असे मला वाटते.

* आपल्या देशात प्रत्येक ठिकाणी असलेले राजकारण हे यशस्वी होण्यासाठी त्रासदायक आहे, असे म्हणता येईल का?
हेवेदावे, राजकारण करून यशस्वी होणाऱ्या व्यक्तीला मागे खेचायचे हे सगळीकडे दिसून येते. परिणामी काम करणारी व्यक्ती निघून दुसरीकडे जाते. त्याचा तोटा संस्थेला होतो. ही जाणीव संस्थांना होणे गरजेचे आहे.

* मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावण्याबद्दल पालकांना काय सांगाल?
वाचनाची गोडी नसताना वाचायला लावणे म्हणजे शिक्षा असते. नसíगकरीत्या गोडी लागावी म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

* तुमच्या विज्ञान कथेतील प्रॉब्लेम सोडवणारी व्यक्ती कायम भारतीय असतात..
मी सामान्यपणे दाखवतो की विज्ञान हे आंतरदेशीय आहे. वेगवेगळ्या देशांतील वैज्ञानिक एकत्र येऊन काम करतात हे दाखवतो. ही वस्तुस्थिती आहे हे आपण डिस्कव्हरी ऑफ गॉड्स पार्टकिलमधून पाहतोच आहोत.

* आपल्या प्रेषित पुस्तकाचा पुढील भाग निघणार आहे का?
लिहावे असे मलाही वाटते आहे. पण वेळ मिळाला, स्फूर्ती असेल तर लिहिले जाईल.

* गणिताची भीती कशी घालवावी, गणित विषय कठीण असणे हा शिक्षण पद्धतीचा दोष आहे का?
हे सारे चुकीच्या पद्धतीने शिकवण्यामुळे झाले आहे. गणित हे रोचक पद्धतीने मांडता येते, पण तशा पुस्तकांची उणीव आहे. इंग्लिशमध्ये आहेत, मात्र मराठीत नाहीत. आमच्या काळी बहुरंगी करमणूक हे तीन भागांतले पुस्तक होते, सध्या तसे काहीच नाही.

* पृथ्वीवरील जीवनसृष्टी अंतरिक्षात सृजन पावून धूमकेतूंच्या माध्यमातून पृथ्वीवर विकसित झाली या सिद्धांतावर आपले काय मत आहे?
हॉएल आणि विक्रमसिंघे यांनी एक सिद्धांत मांडला आहे. धूमकेतू खूप लांबून येऊन सूर्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा लांब निघून जातात. यादरम्यान ते कधी कधी पृथ्वीच्या जवळदेखील येतात. अशा वेळेस धूमकेतूच्या शेपटातून काही धुलीकण अथवा मोलिक्यूल पृथ्वीच्या वायुमंडळात जाऊ शकतात. काही वेळेस जो उल्कापात होतो तो यामुळे. बॅक्टेरिया हे धूमकेतूच्या शेपटातून पृथ्वीच्या वायुमंडळात येतात अशी संकल्पना त्यांनी मांडली. ८० च्या दरम्यान याला खूप विरोध झाला. विरोधकांच्या मते असे बॅक्टेरिया पृथ्वीच्या वायुमंडळाबाहेरील अल्ट्राव्हायोलेट, गॅमा किरण यांच्या तडाख्यातून कसे काय जगतील. तसेच त्यांना जगण्यासाठी अन्न, ऊर्जा कोठून मिळणार. त्यामुळे हे ठोसपणे सिद्ध झाले नाही. पण आम्ही साधारण ४१ किलोमीटरवरील हवेचे नमुने घेतले होते. त्यात असे बॅक्टेरिया आढळून आले, जे या सर्व किरणांच्या तडाख्यातून वाचले आहेत. त्यामुळे या संशोधनाला पुष्टी मिळते. पण ठोसपणे हा सिद्धांत मान्य झाला नाही.

* फ्रेड हॉएल यांना नोबेल या सिद्धांतामुळेच मिळाले नाही, असे मानले जाते हे खरे आहे का?
यावर बरेच लिखाण झाले आहे. नेचर साप्ताहिकाने जेव्हा फॉव्लरना नोबेल मिळाले तेव्हादेखील लिहिले होते. खरे तर फॉव्लर हे स्वत:च अनेक ठिकाणी हॉवेल यांच्या संकल्पना मान्य करतात. त्यांच्याकडूनच मला अनेक कल्पना सुचल्या असेदेखील सांगतात, पण फॉव्लर यांना नोबेल मिळते, पण हॉवेलना मिळत नाही. तसेच हॉवेल यांची बाकीची मते पटत नाहीत म्हणून त्यांना नोबेल मिळू नये हे थोडेसे विचित्र वाटते.

* भारतीय राज्यकर्ते विज्ञानाबाबत उदासीन आहेत. अर्थसंकल्पात विज्ञानाबद्दल खूप तुटपुंजी तरतूद असते, त्यामुळे आपल्या विज्ञानाचा जो काही विकास आहे तो केवळ दळणवळण आणि संरक्षण याच क्षेत्रांत दिसतो, याबद्दल आपले मत काय..
आपल्याकडचे चांगले संशोधन होते ते मुख्यत: म्हणजे स्पेस आणि अॅटोमिक एनर्जी या क्षेत्रात. तिथे ते अगदी पद्धतशीर होते. इतर ठिकाणीदेखील होते, पण त्याबद्दल मी समाधानी नाही. एकंदरीत आपण विज्ञानाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आपण जीडीपीच्या फक्त ०.१ टक्का विज्ञान संशोधनावर खर्च करतो. हे प्रमाण १ ते २ टक्क्यांपर्यंत न्यावे लागेल. मूलभूत संशोधनाबद्दल देखील आपण उदासीन आहोत. ही उदासीनता जर कमी झाली नाही तर सारी काही आपल्याला उसनवारीच करावी लागेल. अशाने आपला विज्ञानाशी संबंध तुटून जाईल.

* तुम्ही जगभरातली अनेक विद्यापीठे पाहिली आहेत. तुम्हाला कुठली शिक्षण पद्धत चांगली वाटते?
असे काही सांगता येणार नाही. केंब्रिजचे रँकिंग उच्च आहे. नोबेलचे परिमाण लावायचे तर मग केंब्रिजमधून आलेल्या नोबेलधारकांची संख्या तुलनेने जास्त आहे. म्हणजे मग तेथील शिक्षण पद्धती जास्त चांगली आहे असे म्हणता येईल.

* आपल्या वैज्ञानिक कथांमधील परग्रहवासी मित्र आहेत, पाश्चिमात्य कथा-चित्रपटांत हेच आक्रमक आहेत, असे का,भारतीय आणि युरोपिअन मानसिकतेचा फरक आहे का?
असे काही नाही. माझे सर्वच परग्रहवासी मित्र आहेत असे नाही. दुसरे असे की, जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाच्या आधारे खूप उंचीवर जाता, तेव्हा अशा लहानसहान कारणांमुळे भांडण उकरून काढणार नाही असे मला वाटते.

* विज्ञानाची गोडी कशी लागेल?

डॉ नारळीकराना स्वतः रेखाटलेले त्यांचे चित्र प्रदान करताना दिनेश नाईक
डॉ नारळीकराना स्वतः रेखाटलेले त्यांचे चित्र प्रदान करताना दिनेश नाईक

यासाठी महत्त्वाचे आहे ते प्रात्यक्षिक, ते केले तर मग गोडी लागू शकते. मला शाळेत शिक्षकांनी दाखवलेले सायफनचे प्रात्यक्षिक आजही आठवते. तसे होणे गरजेचे आहे.

* खगोलाच्या अभ्यासामुळे गणिताचा अभ्यास करता आला नाही याची खंत वाटते का?
होय. कधी कधी वाटते. पण त्यासाठी द्यायला हवा होता तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता.

*आजच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
आपण काय करायचे ते तुम्ही ठरवा. पण जे काही काम हाती घ्याल त्याकडे पूर्ण लक्ष, शक्ती लावून, झोकून देऊन करा.

केम्ब्रिज आणि येथील शिक्षणपद्धतीत फरक काय जाणवला?
महत्त्वाचा फरक म्हणजे विद्यार्थ्यांचे स्वावलंबन अर्थात अभ्यासातले. बनारस येथे जो अभ्यासक्रम वर्षभरात पूर्ण केला जाई तो केम्ब्रिज येथे २४ लेक्चर्समध्ये पूर्ण केला जायचा. लेक्चररला वेगाने जावे लागे आणि अर्थातच विद्यार्थ्यांनादेखील त्याच्यामागे धावावे लागत असे. त्यामुळे वर्गात झालेला अभ्यासक्रम घरी जाऊन पुन्हा केला नाही तर तो नीट समजणे अवघड जाई. या प्रक्रियेत जरा जरी खंड पडला तर ते परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे हा प्रकार सतत सुरू ठेवावा लागत असे. त्यामुळे ही जी सेल्फ हेल्प होती ती महत्त्वाची ठरे. येथे व्यासमामांनी आम्हाला लावलेल्या सवयीचा उपयोग झाला. केम्ब्रिजमध्ये आठवडय़ातून एकदा एका विषयासाठी सुपरवायझरकडे जावे लागे. विषयातले काय कळले काय नाही हे सांगावे लागत असे. त्यामुळे खूप फायदा होत असे.

केम्ब्रिजमध्ये फ्रेड हॉएल यांचा आपणास प्रदीर्घ सहवास मिळाला..
ते खगोल विज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे शिक्षण यॉर्कशायरमध्ये झालेले, केम्ब्रिजमध्ये ते शिष्यवृत्तीवर आले. नंतर फेलो झाले आणि मग प्राध्यापक. त्यांची लहानपणाची एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. शाळेतील शिक्षकांनी त्यांना विशिष्ट फूल, ते देखील पाच पाकळ्या असलेले आणावयास सांगितले. त्यांना सहा पाकळ्यांचे फूल मिळाले. त्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केल्यावर शिक्षकांनी त्यांचा कानच पिळला. हॉवेल वर्ग सोडून निघून गेले. शेवटी शाळा बदलावी लागली. पण त्या शिक्षकांकडे ते परत शिकायला गेले नाहीत. अर्थात वैज्ञानिकाची ही दृष्टीच त्यांना पुढे कामास आली. त्यामुळेच कोणताही सिद्धांत खात्री झाल्याशिवाय मान्य करायचा नाही याचे त्यांनी कसोशीने पालन केले. हे सारे त्यांच्याबरोबर काम करताना आवर्जून जाणवले.

अत्रे आणि माझी जुनी ओळख. एकदा केम्ब्रिजमधून भारतात आल्यावर त्यांनी मोठा सत्कार केला होता. नंतर एकदा लंडनच्या एका हॉटेलमध्ये मी आणि माझा एक भारतीय मित्र चित्रे आम्ही भेळ खायला गेलो, तेव्हा अचानक माझ्या खांद्यावर पाठीमागून कुणीतरी हात ठेवला. ते आचार्य अत्रे होते.

तुम्ही केम्ब्रिजला असताना आचार्य अत्रे यांनी भेट दिली होती आणि नंतर तुमच्यावर लेखही लिहिला होता ना..
अत्रे आणि माझी जुनी ओळख. एकदा केम्ब्रिजमधून भारतात आल्यावर त्यांनी मोठा सत्कार केला होता. तेव्हा अत्रे यांनी ते केम्ब्रिजला येतील असे सांगितले. नंतर एकदा लंडनच्या एका हॉटेलमध्ये मी आणि माझा एक भारतीय मित्र चित्रे आम्ही भेळ खायला गेलो, तेव्हा अचानक माझ्या खांद्यावर पाठीमागून कुणीतरी हात ठेवला. ते आचार्य अत्रे होते. मग नंतर काही दिवसांनी ते केम्ब्रिजमध्ये आले, माझ्याबरोबर संपूर्ण केम्ब्रिज फिरले. भारतात परतल्यावर त्यांनी एक लेख लिहिला. त्यांच्या नेहमीच्या शैलीत- ‘नारळीकरांच्या तपोवनात आचार्य अत्रे.’ वर्णन थोडे अतिरंजित होते पण एकंदर बरोबर होते.

पु. ल. आणि सुनीताबाई यांच्याशी आपले खूप चांगले संबंध होते.
एडिंबरो इथं एका सांस्कृतिक महोत्सवाला मी आणि चित्रे गेलो होतो. आम्ही गप्पा मारत फिरत होतो. समोरून पुलं येत होते. आमचं मराठी बोलणं ऐकून ते आमच्याशी बोलायला आले. आम्ही त्यांना केम्ब्रिजमध्ये यायचं आमंत्रण दिलं. त्यानंतर खरोखरच ते आले. आम्ही त्यांना केम्ब्रिज फिरून दाखवलं. त्यानंतर पुष्कळ वर्षांनी पुण्यात आयुकाचे काम सुरू झाल्यावर त्यांची भेट झाली. आम्ही आयुकात विज्ञान सामान्यांपर्यंत पोहचवतो याचे त्यांना कौतुक वाटले. विशेषत: लहान मुलांसाठी आम्ही जे काम करायचो, त्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मग त्या कामासाठी आम्हाला देणगी दिली. त्यातून आम्ही मुलांसाठी नावाची एक वास्तू बांधली. तिचं नाव काय ठेवायचं, असा प्रश्न पुढे आला तेव्हा ‘पुलस्त्य’ हे नाव पुढे आलं. ‘पुलस्त्य’ हा एक तारा आहे आणि या नावातून पुलं डोकावतायत असे आम्हाला वाटले. त्या इमारतीत लहान मुलांसाठी अनेक उपक्रम सुरू असतात. अरिवद गुप्ता नावाचे आमचे सहकारी लहान मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी बनवतात, विशेषत: टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर कसा करावा हे शिकवत असतात. पुलं गेल्यानंतर एकदा सुनीताबाई आयुकात आल्या होत्या. हे बघून त्या फार खूश झाल्या.

‘पॅसेज टू इंडिया’चे लेखक ई. एम. फॉस्टर यांच्याशी आपली मैत्री कशी काय झाली?
मी किंग्ज कॉलेजचा फेलो असताना फॉस्टर तेथे होते. फॉस्टर हे पूर्वी भारतात असताना देवास संस्थानचे सचिव होते. देवास आणि कोल्हापूर संस्थानचे बरेच संबंध होते. त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा होता. म्हणून त्यांनी मला त्यांच्या शेजारी जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांचा बराच सहवास मिळाला, ते साहित्यिक होते, पण विज्ञानाविषयी आपुलकी होती, त्यामुळे त्यांची माझी बरीच चर्चा होत असे.
केम्ब्रिजमध्ये असताना तिकडेच संशोधनाच्या बऱ्याच ऑफर होत्या, पण तुम्ही इकडे परत आलात हे कसे?
खरे तर मला पीएच.डी. झाल्यावर भारतात परत यायचे होते. पण त्यानंतर फेलोशिप मिळाली. त्याचबरोबर फ्रेड हॉएल यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ थिअरॉटिकल अॅस्ट्रोनॉमी सुरू केली होती. तेथे मी पहिली पाच वष्रे काम करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर मी परत यावे, अशी योजना मी केली होती. १९६५ साली मी एकदा भारतात आलो होतो. अनेक व्याख्याने होत होती. एकदा लाल बहाद्दूर शास्त्रींना हे कळले. त्यांनी मला असे सांगितले की तुम्हाला जेव्हा केव्हा भारतात कायमचे परत यावे, असे वाटेल तेव्हा मला सांगा. मी इकडे यायचा निर्णय घेतला तेव्हा शास्त्रीजी नव्हते. इंदिराजींना मी पत्र पाठवले, त्यात हा संदर्भ दिला. त्यांनी माझ्या पत्राला लगेचच उत्तर दिले आणि तुम्हाला कुठे काम करायला आवडेल ते सांगा असेही सुचवले. मग मी टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये काम करण्याची मागणी केली आणि मी भारतात आलो.

टीआयएफआरमधील तुमच्या कामाचे, संशोधनाचे स्वरूप कसे होते?
केम्ब्रिजमधील कामाचे अध्यापनाचे संशोधनाचे जसे स्वरूप होते तसेच येथेदेखील होते. त्यामुळे एक देश सोडून दुसरीकडे आलोय असे वाटले नाही.

तुम्ही मुंबईचे जावई झालात, त्याबद्दल थोडेसे सांगा..
याबाबत मुंबई विद्यापीठाला ‘अल्मा मेटर इन लॉ’ असं म्हणता येईल. माझी पत्नी रुईया कॉलेजमध्ये शिकली. त्यामुळे या कॉलेजलाही ‘अल्मा मेटर इन लॉ’ म्हणता येईल. तेव्हा मी टीआयएफआरमध्ये काम करायचो. माझे वडील निवृत्त झाल्यानंतर आई-वडील दोघंही आमच्या घरी राहायला आले होते. ते दोघं, आमच्या दोन मुली आणि आम्ही दोघं असं सहा जणांचं आमचं कुटुंब होतं. माझे आई-वडीलही माझ्या घरी राहायचे. तेव्हा लोकांना प्रश्न पडायचा की सासू -सून एकत्र राहत असताना यांच्यात भांडणं होत असतील का.. पण कोणत्याही गोष्टीत वैज्ञानिक कारणं शोधायची आम्हाला सगळ्यांना सवय असल्यामुळे तसे प्रसंग बहुधा फारसे यायचे नाहीत.

मुलींनी ठरावीक शिक्षण घ्यावे, असा तुमचा आग्रह होता का?
असा काही आग्रह नव्हता. फक्त आम्ही त्यांना कोणत्याही क्लासमध्ये पाठवले नाही. क्लासमधून रेडिमेड उत्तरे मिळवण्यापेक्षा स्वत: अभ्यास करून शोधा हेच सांगणे होते. व्यासमामांनी आम्हाला दिलेला सेल्फ हेल्पचा धडा मी त्यांनादेखील गिरवायला लावला.

आयुकाची स्थापना कशी झाली?
१९८८ साली आयुका स्थापन झाली. त्याआधी दोन वष्रे नारायणगाव येथे एका रेडिओ दुर्बिणीची योजना मंजूर झाली होती. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप नावाचा हा प्रकल्प टीआयएफआरने सुरू केला होता. त्या दुर्बिणीचे नियंत्रण आणि अभ्यास यासाठी पुणे विद्यापीठात एक जागा घेतली होती. यूजीसीचे तत्कालीन संचालक यशपाल यांनी हे सर्व पाहिले. या दुर्बणिीचा फायदा, तसेच विज्ञानातील घडामोडींचा फायदा शालेय विद्यार्थी तसेच सर्व विद्यापीठांना मिळावा, अशी योजना त्यांनी आखली आणि इंटर युनिव्हर्सिटि सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुकाची स्थापना झाली. अर्थात आज मिळणाऱ्या प्रतिसादावरून हा उपक्रम यशस्वी झाला, असे नक्की म्हणता येईल.

तुमच्या मते आयुकाचं योगदान काय?
आयुकात संशोधन करणारे अनेक प्रकारचे संशोधक असतात. पण विद्यापीठीय स्तरावरूनदेखील अनेक जण यात सामील होतात. नेमके उदाहरण द्यायचे तर चांगल्या दुर्बणिीतून तुम्हाला काही निरीक्षणे करायची असतील तर यापूर्वी त्यासाठी बाहेरील देशांवर अवलंबून राहावे लागत असे आणि ते तितकेसे सहजसाध्य नव्हते. पण आज या माध्यमातून ते आपल्याच देशात होत असल्याचे दिसून येते.

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी काय करावे लागेल, माध्यमे काय करू शकतील?
करण्यासारखे खूप आहे पण तेवढय़ा प्रमाणात काम होत नाही. माझा असा विश्वास आहे यासाठी लहान मुलांवर योग्य ते प्रयोग करावे लागतात. पण हे मोठय़ा प्रमाणात होणे गरजेचे आहे. एखादी संस्था किती काळ आणि कोठवर पुरणार? प्रसिद्धी माध्यमात विज्ञानाबाबत इंग्लिश माध्यमासारखे जर काम करायचे तर प्रायोजकत्व मिळणे गरजेचे आहे. त्यातून योग्य निधी मिळाला तर हे शक्य आहे.

खगोलशास्त्रात भविष्यात करिअरच्या संधी काय आहेत?
दोन मोठय़ा संधी आहेत. गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप करणारी लायबो ही यंत्रणा सध्या अमेरिकेत कार्यरत आहे. त्याचा काही भाग भारतात सुरूहोत आहे. दुसरे म्हणजे तब्बल ३० मीटर व्यासाची दुर्बीण बनविण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. अर्थात हा प्रकल्प एका देशाला परवडणारा नाही. अनेक देश एकत्र येऊन करणार आहेत, त्यात भारतदेखील सहभागी होत आहे. हे सर्व प्रकल्प हाताळण्यासाठी, खगोलशास्त्रज्ञाची गरज भासणार आहे.